नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात आंदोलन करायचे का, ठोस उपाययोजना केव्हा करणार, असा सवाल प्रभाग २४ मधील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला केला आहे. पावसामुळे साचणार्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना हाती घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन मंगळवारी, २१ मे रोजी दिले आहे.
जगतापनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, गोविंदनगर, बडदेनगर, पांगरे मळा, कृष्णबन कॉलनी, कोशिकोनगर, सदाशिवनगर, कर्मयोगीनगर आदी संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ मध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी साचते. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होते. पावसाळा तोंडावर असतानाही वरील समस्या उद््भवणार नाहीत, यासाठी कुठल्याही उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत. गेल्या वीस वर्षांपासून या भागात ही समस्या आहे. सात वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात आंदोलन करून नागरिकांकडून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाते. तेव्हा पाण्याचा निचरा होणारी तात्पुरती उपाययोजना केली जाते. पावसाळी गटारसाठी आर्थिक तरतूद धरा, प्रश्न निकाली काढा, यासाठी विद्यमान आयुक्तांसह पूर्वीच्या आयुक्तांनाही शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने वेळोवेळी निवेदने दिली आहेत. येथील रहिवाशी घरपट्टी, पाणीपट्टीसह महापालिकेचे विविध कर नियमित भरतात. तरीही त्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही, म्हणूनच प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, ते फक्त प्रश्न नसून जनभावना, जनतेचा संताप आहे. गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन होईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. ‘नेहमीची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे जनतेने साचलेल्या पाण्यात आंदोलन करायचे, प्रशासनाने ऐनवेळी धावपळ केल्यासारखे करून तात्पुरती मलमपट्टी करायची, हे किती वर्षे चालणार, असा सवाल करण्यात आला आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा, पाणी साचून आंदोलन होण्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, बापूराव पाटील, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.