पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुण्यातील ‘हिट अँड रन’प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशीचे आदेश दिले आहेत. आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहे.
शिंदे यांनी आज पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता आणि राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे म्हटले आहे.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत असल्याने अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर कोणाचाही दबाव नव्हता आणि यापुढेही राहाणार नाही, असे स्पष्ट केले. याप्रकरणी कारवाई सुरू असून पब मालक आणि व्यवस्थापक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाइकांना वाईट वागणूक आणि आरोपींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.