नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चुंचाळे शिवारातील घरकुल योजना भागात पूर्ववैमनस्यातून एकाने ४५ वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत महिला किरकोळ भाजली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मधू पैलवान (रा,घरकुल योजना चुंचाळे) असे अॅसिड हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत मंगला सुनिल ठोके (रा.बिल्डींग नं. सीएच ०१ घरकुल योजना) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आणि फिर्यादी महिला एकाच भागात वास्तव्यास असून त्यांच्यात वाद आहे. सोमवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी महिला आपल्या घर परिसरातील फ्लोवर मिल समोरून रस्त्याने पायी जात असतांना संशयिताने हे कृत्य केले.
मागील भांडणाचा राग मनात धरून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या संशयिताने बाटलीत असलेले अॅसिड महिलेच्या दिशेने फेकले. सुदैवाने महिलेने प्रसंगावधान राखत पळ काढल्याने अॅसिड जमिनीवर पडले. मात्र काही थेंब तिच्या अंगावर पडल्याने ती भाजली असून अधिक तपास उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत.