इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात २० लाख, ३० हजार, १२४ मतदार असून ५७.१० टक्के ११ लाख ५९ हजार २०० मतदारांनी हक्क बजावला. विधानसभा निहाय टक्केवारीत सिन्नर ६८, नाशिक पूर्व ५६, नाशिक मध्य ५७, नाशिक पश्चिम ६०, देवळाली ६१ इगतपुरी ६६ असे मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदार संघात कोणाला किती व कसा फायदा होतो यावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे व अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात मुख्य लढत झाल्याचे चित्र होते. त्यात वंचितचे करण गायकर यांनीही काही भागातून चांगली मते घेतली आहे. त्यामुळे येथील लढतीचे चित्र प्रत्येक भागातील आकडेवारी समोर आल्यानंतर समोर येईल. तोपर्यंत अंदाज व्यक्त करणे व दावा करणे हेच हातात आहे. तिरंगी लढतीत शांतीगिरी महाराज किती मते घेतात व त्यांचा फटका कोणाला बसतो यावरही येथील निकाल अवलंबून असणार आहे. साडेपाच लाख मतदान घेणार येथे सहज निवडून येऊ शकतो. पण, तिरंगी लढतीत हे मतदान विभागाले जाणार आहे.
तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघात एकुण मतदार हे १८ लाख, ५३ हजार, ३८७ आहे. या मतदार संघात ६२.६६ टक्के मतदान झाले असून ११ लाख ६१ हजार ८९ मतदारांनी आपला मतदाराचा हक्क बजावला आहे. सहा विधानसभा मतदार संघ आहे. विधानसभा निहाय आकडेवारी सुध्दा समोर आली असून त्यात नांदगाव ५५.१, कळवण ६३.४५, चांदवड ६६.०२, येवला ६३.२ , निफाड ६२.७६, दिंडोरी ६६ टक्के मतदान झाले आहे.
या मतदार संघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात मुख्य लढत झाली आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवारावर सुरुवातीपासून नाराजी असल्याचे चित्र होते. ते मतदानातही दिसले. तर भगरे यांची उमेदवारी नवखी असून त्यांना बुहतांश मतदार संघात चांगले मतदान झाले. ही निवडणूक सरळ व एकास एक असल्यामुळे मतदार संघनिहाय मताधिक्य कोणाला किती मिळेल यावर दोघांचे भवितव्य अवलंबून आहे. कांद्याचा प्रश्नाभोवती ही निवडणूक असल्यामुळे येथे धक्कादायक निकाल येईल असे बोलले जात आहे.या मतदार संघात साडेपाच लाखाच्या आसपास मतदान ज्याला मिळेल त्याचा विजय निश्चित आहे.
नाशिक जिल्हयात अर्धा लोकसभा असलेल्या धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघातही भाजपचे डॅा. सुभाष भामरे व काँग्रसेच्या डॅा. शोभाताई बच्छाव यांची निवडणूक चुरशीची झाली आहे. डॅा. भामरे यांच्यावर असलेल्या नाराजीचा कितपत फायदा डॅा. बच्छाव यांना होतो हे महत्त्वाचे आहे. पण, सुरुवातील एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्यात चुरशीची झाली आहे. त्यात डॅा. बच्छाव यांना संधी असल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पारंपारिक मतदानामुळे डॅा. भामरे तिस-यांदा बाजी मारेल असाही दावा केला जातो आहे.