इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः अहमदनगर महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात, असे या नोटिशीत बजावण्यात आले आहे. गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची तीन दिवसांच्या आत विल्हेवाट लावावी, तसे न केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत आणि पीओपीच्या मूर्तीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्राच्या आधारे महापालिकेने नगर शहरातील १३० कारखानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने ही नोटीस अन्यायकारक असल्याचे म्हणत निषेध केला आहे. पीओपी मूर्तीचे उत्पादन आणि विक्रीवर कोणतीही बंदी नाही. सरकारने विधान परिषदेत मागील वर्षीच तसे स्पष्ट केले आहे. असे असताना या नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील मूर्तीकार कुटुंबांना बेरोजगार करू नये, असे संघटनेने म्हटले आहे.