इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला सकाळी नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी आणले व काही कळायच्या आतच त्याला मुंबईला घेऊन गेल्याचे वृत्त आहे. सकाळी त्याला शिंदे पळसे गावात पोलिसांनी आणले होते. पण, या गोष्टीची गुप्तता पाळण्यात आली. साध्या वेशात व खासगी गाडीने हे पोलिस आले. त्यांनी ललितला बुरख्यातून कारखान्यात नेले. येथून ललित पाटील याच्याकडून सर्व माहिती घेऊन ते तेथून काही मिनीटातच रवाना झाले. त्यानंतर त्यांनी उपनगर गाठले. पण, या ठिकाणी त्याच्या घरी पोलिस गेले नाही. त्यानंतर पोलिस व्दारका मार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे वृत्त आहे.
उद्या ललिल पाटील याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याअगोदर पोलिसांनी त्याला नाशिकला आणून कसून चौकशी केली. त्याच्या ड्रग्ज जाळ्याची संपूर्ण माहिती करुन घेऊन पोलिसांनी आपले पुरावे अधिक बळकट केले. साकीनाका पोलिसांनी याअगोदर याच काऱखान्यावर ३०० कोटीचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर ललित पाटील याच्यासह १६ जणांना अटक केली. या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत असून त्याचा संपूर्ण तपास आता पोलिस करत आहे.
य़ाअगोदर नाशिकमध्ये सराफाकडून ८ किलो सोने खरेदी केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस आता या सराफ व्यापा-याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली होती. आतापर्यंत या प्रकरणात ८ किलो सोने खरेदीपैकी ३ किलो सोने हस्तगत करण्यात आले असून ३ किलो सोने जप्त करणे बाकी आहे. नाशिकमध्ये कोणत्या सराफाने हे सोने दिले याची चर्चा आता सुरु आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे सोने विक्री केल्यामुळे पोलिसांनी नेमकं काय कनेक्शन आहे हे शोधून काढायचे असल्यामुळे पोलिस नाशिकला आल्याचे बोलले जात होते. पण, तसे काहीच झाले नाही. पोलिसांनी शिंदे पळसे येथे चौकशी केल्यानंतर ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
असे आहे ललित पाटील याचे जाळे
ललित पाटील यांचे जाळे फक्त महाराष्ट्रापूरते मर्यादीत नव्हते तर ते देशातील वेगवेगळया राज्यात पसरले होते. त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाच्या संपर्कात होता. अशी माहिती आता समोर आली आहे. परवा नाशिकच्या शिंदे गावात ड्रग्ज कारखान्यातून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यात ते मुंबई नाशिक, नवी मुंबई व ठाणे येथे पाठवले जात असल्याचे पुढे आले होते. यातून पाटील याला निव्वळ नफा ५० लाख रुपये मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. २०२१ पासून येथे या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवले जात होते. आज नवीनच माहिती समोर आली आहे. ललित पाटील प्रकरणात असे अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहे.
चालक, दोन साथीदार महिलांना अटक
याप्रकरणात गुरुवारी रात्री त्याच्या चालकाला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गजाआड केले आहे. सचिन वाघ (३०) असे या चालकाचे नाव आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यापासून हा चालक ललित पाटील बरोबर होता. त्यानेच वेगवेगळ्या ठिकाणी ललित पाटील याला वाहनातून नेल्याचेही समोर आले आहे. तर त्याचदिवशी नाशिकहून ललित पाटील याला मदत करणा-या दोन महिला प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली. त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी १६ आरोपींना अटक केली आहे.
प्रज्ञा ललित पाटीलची प्रेयसी
पोलिसांच्या तपासात प्रज्ञा ही ललित पाटीलची प्रेयसी असल्याची माहिती समोर आली असून ड्रग्ज रॅकेट चालवण्याचे प्लॅनिंग ती करत होती. या दोघांचे खासगी फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात ललित पाटील मॉलमध्ये, सिगारेट पितांना तर कधी प्रज्ञाबरोबर तो दिसत आहे. ललित पाटील जवळ असलेल्या दोन आयफोनच्या माध्यमातून ललित पाटील आपल्या साथीदारांशी आणि प्रज्ञा कांबळेशी संपर्कात होता.
ब-याच गोष्टी येत आहे समोर
७ ऑक्टोबरला ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. त्यात नाशिकमध्ये ३०० कोटीचे त्याच्या काराखन्यातून ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या भावासह एकाला अटक केली. दुसरीकडे नाशिक पोलिसांनी छापा टाकत ५ कोटीचे ड्रग्ज जप्त केले. मुंबई, नाशिक, पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे एकुणच ललित पाटील याचे रॅकेट संपूर्ण उघड होत असून अजून त्यात ब-याच गोष्टी समोर येणार आहे. त्यात आता ही ५० लाखाची माहिती समोर आली आहे.