नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान कक्षावर हार घालणे त्यांच्या अगंलट आले आहे. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
शांतीगिरी महाराज यांचे त्र्यंबकेश्वरच्या काल, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान होते. मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला असलेल्या पुठ्य़ाला घातला. त्याअगोदर त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलपुजाने पुजा करुन वंदन केले. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, मी एव्हीएमला हार घातला नाही. कक्षात खर्ड्यावर भारत मातेचे चित्र होते. त्याला हार घातला. आयोगाने आम्हाला आदर्श आचारसंहितेची नियमावली दिली नाही. आदर्श आचरसंहितेचे नियम माहीत असते तर हे कृत्य केले नसते. गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात माझे वकील नियमानुसार कार्यवाही करतील.