नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात उत्साहात सकाळी मतदानाला सुरवात झाली. सकाळी नऊ पर्यंत नाशिकमध्ये ६.४५ टक्के तर दिंडोरीत ६.४० टक्के मतदान झाले. दोन्ही मतदार संघात मतदारांमध्ये उत्साह आहे. सकाळी बहुतांश उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक येथे मतदान केंद्र, मनपा शाळा क्र.१४,१५ मखमलाबाद येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्र २२८ वर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला. बॉईज टाऊन स्कूल येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर सुशिला उदयकुमार छाजेड वय ८० यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिंडोरी मतदार संघातील मौजे डोंगरगाव येथे १०० वर्षावरील आजीने मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात १८ लाख, ५३ हजार, ३८७ तर नाशिक लोकसभा मतदार संघात २० लाख, ३० हजार, १२४ मतदार आहेत. नाशिकमध्ये १ हजार ९१० तर दिंडोरीमध्ये १ हजार, ९२२ मतदान केंद्र असून १७ हजार २८ कर्मचारी केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकूण ५ हजार ८२ महिला कर्मचारी आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघात ९५५ केंद्रावर तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात ९६१ केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये २ हजार ३१७ ठिकाणी व्हीलचेअरची तसेच ६२२ मतदारांना वाहतुक सुविधा पुरवण्यात आले आहे.