इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती लोकसभा मतदार संघात पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रसेच शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्या तक्ररीची गंभीर दखल आता निवडणूक आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरातली मतदान केंद्र १६७ बारामती नगरपरिषद, निलम पॅलेस जवळील साठेनगर येथील अंगणवाडी परिसरात कोणीतरी अज्ञात व्यक्ती पैसे वाटप करत असल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत झाला होता. याची दखल घेत बारामतीचे तहसीलदार यांच्यामार्फत पुणे जिल्हा परिषदेचे उपविभाग पाटबंधारे शाखा अभियंता केशव तुकाराम जोरी यांनी फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी यासंदर्भात पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते की, अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ… आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असंही म्हणू नका!