जगदीश देवरे
जेव्हा संघ अजेय ठरत जातो, तेव्हा प्रत्येक सामन्यागणिक भितीचा एक कोपरा जास्त संवेदनशील होऊन जातो. २०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघ गेल्या ४ सामन्यात निर्विवादपणे अपराजित राहून सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे न्युझीलंड देखील ४ सामन्यात पराभूत झालेला नाही आणि नेट रनरेटच्या किरकोळ फरकाने भारताच्या डोक्यावर जाऊन बसला आहे.
आजचा सामना आहे तो याच दोन ‘अजेय’ संघात. हिमाचलच्या सर्वांगसुंदर अशा धरमशाला येथील मैदानावर या दोघांपैकी कुठल्या तरी एका नावासमोर पराभवाचा ठसा नक्की उमटेल. कोणता असेल तो संघ? या प्रश्नाचे उत्तर आज रात्रीच्या पहिल्या प्रहरात मिळणार हे नक्की. सामना भारतीय मैदानावर होतो आहे आणि संपूर्ण संघ फार्मात आहे हे ‘वर्तमान’ जरी भारतीय संघाच्या बाजूने असले तरी आयसीसी स्पर्धेतील जबरदस्त विजयाचा ‘इतिहास’ मात्र न्युझीलंडच्या बाजूने आहे हे नक्की.
१९९२ पासून आत्तापावेतो ज्या एकूण ९ इव्हेन्टमध्ये भारताची गाठ न्युझीलंडसोबत पडली आहे. त्यापैकी ८ सामन्यात न्युझीलंडचा तर अवघ्या एका सामन्यात भारताचा विजय झाला आहे, या आकडेवारीकडे डोळेझाक करून चालणार नाही. १९९२ च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेनंतर १९९९ साली न्युझीलंडने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर सन २००० ची चँम्पिअन्स ट्रॅाफीची फायनल, २००७ आणि २०१६ च्या टी२० विश्वकप स्पर्धेतल्या साखळीत झालेला पराभव, पुन्हा २०१९ मध्ये वन-डे विश्वचषक स्पर्धेतल्या सेमी-फायनलमध्ये झालेला पराभव, २०२१ च्या विश्व टेस्ट चॅम्पिअनशिप मधला ओल्ड ट्ररॅफर्ड इथला पराभव आणि त्यानंतर शेवटी अद्यापही ताजा असलेला २०२१ मधील टी२० विश्वकप स्पर्धेतल्या साखळीतला पराभव ही न्युझीलंड संघाची भारतीय संघाविरूध्दची आजवरची कामगिरी आहे. या सगळ्या आयसीसी सामन्यातील पराभवाच्या यादीत २००३ साली भारताने सेंच्युरिअन मध्ये वन-डे विश्वचषक स्पर्धेत न्युझिलंडवर मिळवलेला एकमेव आयसीसी विजय म्हणजे आता दळदार, टपोरे कणिस धरलेल्या विस्तीर्ण शेतात
उभ्या असलेल्या बुजगावण्यासारखा वाटतोय. आज धरमशालात प्रत्यक्ष सामना सुरू होण्यापूर्वी ही आकडेवारी भारतीय संघाला कुठेतरी भेडसावणार आहे हे नक्की. भारताविरुध्द पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत ८ पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता म्हणून आम्ही किती आनंदात होतो. याच दबावाचे आम्ही हत्यार बनवून नवव्या वेळेसही त्यांना विजय मिळवू दिला नाही. परंतु, ही वर सांगितलेली न्युझीलंडची आकडेवारी आता त्यापेक्षा वेगळी आहे असे कसे म्हणता येईल?.
धरमशालात भारतीय संघाला थोडी थंडी जास्त वाजणार आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट झाल्याशिवाय रहात नाही. आता आकडेवारीच्या या मायाजालातला हा इतिहास अंगावर घ्यायचा की तो झुगारून नव्याने इतिहास लिहायचा हे रोहीतच्या टीमला शिकवण्याची गरज नाही.