इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः मॉन्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. गेल्या वर्षीही १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झाला होता; मात्र केरळमध्ये तो आठ जूनला दाखल झाला होता.
यंदा मॉन्सून केरळमध्ये ठरलेल्या तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो. केरळमध्ये मॉन्सूनच्या तारीख एक जून आहे. त्यात चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. २८ मे ते ३ जून दरम्यान केरळमध्ये मॉन्सून दाखल होऊ शकतो. मॉन्सून ९ ते १६ जूनदरम्यान महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये, २५ जून ते ६ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात १८ ते २५ जूनपर्यंत तर आणि बिहार-झारखंडमध्ये १८ जूनपर्यंत पोहोचू शकतो.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गेल्या दीडसे वर्षात मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखा वेगवेगळ्या होत्या. १९१८ मध्ये, मॉन्सून ११ मे रोजी केरळमध्ये, तर १९७२ मध्ये, १८ जून रोजी सर्वात उशिरा केरळमध्ये त्याचे आगमन झाले होते. गेल्या चार वर्षांत २०२० मध्ये मॉन्सून १ जून, २०२१ मध्ये ३ जून, २०२२ मध्ये २९ मे आणि २०२३ मध्ये आठ जून रोजी केरळमध्ये पोहोचला.
गेल्या वर्षी एल निनो सक्रिय होता, तर या वेळी एल निनोची स्थिती संपली असून तीन ते पाच आठवड्यांत ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, एल निनो दरम्यान, सामान्यपेक्षा ९४ टक्के कमी पाऊस झाला होता. २०२० ते २०२२ या काळात ला निना स्थिती असताना, १०९ टक्के, ९९ टक्के आणि १०६ टक्के पाऊस झाला.