पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील एका रिक्षाचालकाने निवृत्त पोलिसांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीस्वार असलेल्या निवृत्त पोलिसांचे या रिक्षाचालकाबरोबर भांडण झाल्यानंतर तो निवृत्त पोलिसाच्या हाताला चावला. यात त्यांच्या अंगठ्याचा समोरचा भागच तुटला. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर निवृत्त पोलिस ज्ञानेश्वर खंडु बेंद्रे यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रिक्षाचालक गणेश सोमनाथ भुसावळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठेत ही घटना घडली आहे.
बेंद्रे हे आपल्या पत्नीसोबत घरगुती सामान खरेदी करण्यासाठी आले होते. पार्किंग केलेली दुचाकी काढत असताना रिक्षा चालक आणि त्यांच्याच वाद झाला. रिक्षाचालकाने त्यांना शिवीगाळ करुन शर्ट फाडले. त्यानंतर धक्काबुक्की करून उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोरदार चावा घेतला.