नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅसची परस्पर चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरलेल्या सिलेंडरमधून एकास गॅस काढतांना रंगेहात पकडण्यात आले असून, या मुळे ग्राहकांना घरपोहच मिळणा-या गॅसची वितरण व्यवस्था चर्चेत आली आहे. घटनास्थळावरून अॅटोरिक्षासह सिलेंडरच्या टाक्या असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबाद शिवारातील सहारानगर येथील मानकर पेट्रोलपंप मागील मोकळया जागी घरगुती गॅसमधून बेकायदा गॅस चोरला जात असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. १८) सायंकाळी पोलीसांनी छापा टाकला असता या ठिकाणी ग्राहकांना पुरविण्यासाठी दिलेल्या सिलेंडरमधून चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला.
निमुळत्या पोकळ पाईपच्या माध्यमातून भरलेल्या टाकीतील गॅस रिकाम्या टाकीत भरला जात होता. पथकाने राजेंद्र गजेंद्र मोहिते (४८ रा. गंगोत्री विहार कॉलनी,अमृतधाम) यास ताब्यात घेत या ठिकाणाहून अॅटोरिक्षासह भरलेली आणि रिकामी सिलेंडर असा सुमारे १ लाख १२ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. दरम्यान ग्राहकाला घरपोहच मिळणा-या भरलेल्या सिलेंडरमधून परस्पर एक दोन किलो गॅस काढून घेतले जात असल्याचे या घटनेतून उघड झाले असून याप्रकरणी अंमलदार प्रमोद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार वसावे करीत आहेत.