इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो, मात्र शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये आपसात चर्चा झाली नव्हती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचाच विचार चालू होता, मात्र अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध केला होता असे सांगत त्यांनी चेंडू पुन्हा अजित पवार गटाकडे फेकला.
राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्याचे मतदान सोमवारी होत असतांना मागच्या घटना बाहेर काढल्या जात असल्यामुळे राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यात राऊत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी , जे नेतृत्व महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला मान्य होईल. यावर या दोन्ही प्रमुख नेत्यांचे एकमत झाले होते. पण, सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असं तटकरे, पवार आणि वळसे पाटील यांनी सांगितलं होतं. हे नेते म्हणाले होते, आम्ही वरिष्ठ आहोत आम्ही एका कनिष्ठाच्या हाताखाली काम करणार नाही असे म्हटले होते.
भाजपचाही विरोध होता
२०१९ साली जेव्हा मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपात वाद चालू होता तेव्हा शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती. एकनाथ शिंदे हे आमचे विधिमंडळ नेते असल्यामुळे तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचंच नाव पुढे गेले असते. परंतु, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला एक निरोप पाठवला. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत दिल्लीचा निर्णय काय होईल हे आम्हाला माहिती नाही. परंतु, आम्हाला मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे चालणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांसह आज भाजपाचे महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते आहेत, त्या सर्वांची हीच भूमिका होती. तेव्हा एकनाथ शिंदे कोणालाच नको होते, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे म्हणणे होते की एकनाथ शिंदें यांचा अनुभव कमी आहे. तसेच पैसा फेको तमाशा देखो अशी त्यांची कामाची पद्धत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.