इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेची रणधुमाळी सुरु असतांना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून त्यामुळे राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, १९९९ मध्ये जर मी शरद पवार यांच्याबरोबर गेलो नसतो तर काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर होती असे त्यांनी सांगून राजकीय खळबळ निर्माण केली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यावर भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, १९९५ मध्ये जेव्हा आमचे सरकार गेले. त्यावेळी शरद पवार यांनीच मला एमएलसी केले होते. त्यानंतर मी विरोधी पक्षनेता झालो. त्यावेळेस मी वन मॅन आर्मी लढलो. तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो. पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे. मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो.
शरद पवारांना जेव्हा काँग्रेसमधून बाहेर काढले गेले. काँग्रेस पक्ष त्यावेळेस फुटला, त्यावेळेस सुध्दा मी पवारांसोबत न जाता काँग्रेसमध्ये थांबावे काँग्रेस पुढच्या होणा-या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषीत करु असे मला अनेक फोन मॅसेज आले असेही भुजबळ यांनी सांगितले. त्यावेळेस माधवराव शिंदे, शीला दिक्षित, फर्नांडिस, राजेश पायलट, मुकुल वासनिक, सुरेश कलमाडी यांनी मला काँग्रेसमध्ये थांबण्याचा आग्रह केला होता. ते म्हणाले तुम्ही या दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून तुमचे नाव घोषित करतो.
त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झालो. पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले असे सांगत भुजबळांनी जुन्या गोष्टींना उजाळा देत मोठा गौप्यस्फोट केला.