नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील मतदान स्थगित झालेल्या 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांचाही समावेश आहे.
या टप्प्यातील मतदानासाठी ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण १९७८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सर्व ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी (जम्मू आणि काश्मीरमधील 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील स्थगित मतदान वगळता) ६ व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२४ होती. दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर, ९०० उमेदवारी अर्ज वैध आढळून आले. -अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते आणि त्यापैकी २१ उमेदवारी अर्ज वैध असल्याचे आढळले.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ४७० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, त्याखालोखाल हरियाणामध्ये १० लोकसभा मतदारसंघांमध्ये ३७० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. झारखंडमधील रांची लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्या खालोखाल देशाची राजधानी दिल्ली मधील ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात ६९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सहाव्या टप्प्यासाठी सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची सरासरी संख्या १५ आहे.