मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. देशभरातील ४९ लोकसभा मतदार संघात या निवडणुका होणार आहे. २० मे रोजी या सर्व जागेवर मतदान होणार आहे. महाराष्ट्र १३, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ७, बिहार ५, झारखंड ३, ओडिशा ५, जम्मू कश्मीर व लडाख येथील प्रत्येकी एक – एक जागेवर या निवडणुका होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये नाशिक, दिंडोरी, भिवंडी, धुळे, पालघर, धुळे, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा लोकसभा अशा एकूण १३ जागांवर मतदान होणार असून दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या मतदानावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, भारती पवार, कपिल पाटील, सुभाष भामरे असे मंत्री तर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे आणि वकील उज्जव निकम यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
गेल्या चार टप्प्यात महाराष्ट्रातील ३५ जागांवर मतदार पार पडले आहे. आता हा शेवटचा टप्पा असून १३ जागेवर मतदान होणार आहे. एकुण ४८ जागा असल्यामुळे पंतप्रधान मोदी यासह भाजपने या निवडणुकीत विशेष लक्ष घातले. यंदा सभा व रोडशोचा धडाका लावला होता. या सर्व निवडणुकी चुरशीच्या होणार असल्याचे संकेत असल्यामुळे सर्वांचे लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे.