बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास ३ हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत प्रस्ताव दाखल करताना जागा उपलब्ध असेल तरच प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केल्या.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद, अंतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थिती होते. मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इतर कुटुंबांसाठी त्यांनी केलेले कार्य अभिमानास्पद आहे.
महिला व बालविकास विभागतंर्गत महाराष्ट्रात जिल्ह्याने सर्वाधिक १७ हजार अंगणवाडी मदतनीसांची भरती करून आदर्श निर्माण केला आहे. शासनाने इयत्ता बारावी उत्तीर्णची अट ठेवली होती. तथापि, आपल्याकडे उच्च शिक्षित महिलांनी अंगणवाडी सेविका म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळे भविष्यात अंगणवाडीमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अंगणवाडी सेविकांना शासकीय कामे मोबाईलद्वारे करावी लागतात त्यामुळे सरकारने त्यांना मोबाईल द्यावेत, अशी त्यांची मागणी शासनाच्या विचाराधीन आहे. दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याचेही नियोजन आहे. बालविवाह रोखण्यामध्ये खूप अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर मात करण्यामध्ये बीड जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार बीड येथे एक महिन्याच्या आत बालविवाह रोखण्यासाठी अद्ययावत रेसिडेन्सी कार्यालय देण्याचा प्रयत्न राहील. अंगणवाडी सेविकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात शासन निर्णय घेत आहे. लेक लाडकी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना तीन टप्प्यांमध्ये लाभ देण्यात येईल. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करावेत आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावेत असे आवाहनही त्यांनी केले. यापुढे अंगणवाडीचे वर्ग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमधील एका खोलीमध्ये भरले जावेत यासंदर्भात ठोस कृती निर्णय घेण्यासंदर्भात देखील शासन निर्णय घेत आहे.
यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत १३ अंगणवाडी पर्यवेक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तर ५ अंगणवाडी सेविकांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीचे आदेश प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही जणांना वाटप करण्यात आले.
“माझी कन्या भाग्यश्री” च्या लाभार्थींना त्यांचा लाभ वाटप करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील १४ बचत गटांना १ कोटी १४ लक्ष रुपयाचा निधी देखील त्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यामध्ये चार लाखापेक्षा अधिक मजुरांचे ऊस तोडीसाठी स्थलांतर होते. यावेळी महिलांनी ऊस तोडीसाठी स्थलांतर करू नये म्हणून त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा तसेच बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर लोकप्रतिनिधींनी जनजागृती करणे नितांत गरजेचे आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.