नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी खर्च निरीक्षक प्रवीण चंद्रा (IRS) व सागर श्रीवास्तव (IRS) यांच्या उपस्थितीत १८ मे २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह ‘शिवनेरी’ सभागृह, नाशिक येथे यशस्वीरित्या पार पडली. सदर तपासणीत ३१ उमेदवारांपैकी २८ उमेदवार/प्रतिनिधी उपस्थित होते. श्रीमती भाग्यश्री नितिन अडसुळ (इंडियन पीपल्स अधिकार पार्टी), श्रीमती दर्शना अमोल मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) आणि आव्हाड झुंझार म्हसुनी ( बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ) हे उमेदवार सदर बैठकीत अनुपस्थित असल्यामुळे त्यांना भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे नोटीस देण्यात आलेली आहे.
सदर बैठकीत खर्च निरीक्षक प्रवीण चंद्रा व सागर श्रीवास्तव यांनी सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्याची तपासणी केली. तिसरी तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही निवडणूक आयोग यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. द्वितीय तपासणी मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांना दिनांक ०८.०५.२०२४ व १२.०५.२०२४ रोजी मा. मुख्यमंत्री यांनी नाशिक शहरात प्रचारासाठी घेतलेल्या बैठकीचे खर्चाचे तपशील उमेदवाराच्या हिशोब नोंदवहीत आलेला नव्हता या अनुषंगाने जिल्हाधिकारी, नाशिक यांचे स्तरावरून उमेदवारांना याबाबत नोटीसी द्वारे खुलासा मागविण्यात आला होता. त्याअनुषंगाने उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने दिलेल्या खुलासा विचारात घेवून खर्चवहीत नोंदविण्यात आलेला खर्च मान्य केलेला आहे.
१३.०५.२०२४ व दिनांक १५.०५.२०२४ रोजी मा. उदय सामंत , उद्योगमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नियमप्रमाणे खर्च निरीक्षक यांनी त्याबैठ्कीचा खर्च नोंदविला. सदर खर्च गोडसे यांचे खर्च प्रतिनिधी यांनी मान्य न केल्यामुळे उमेदवारास याबाबत खुलासा मागविण्यात येत आहे. १३ मे, २०२४ रोजी १२४ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात शिवसेना (उबाठा )चे उमेदवार श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांनी २ बाईक रॅली आयोजित केलेली होती. सदर बाईक रॅली करीता अधिकृत पूर्व परवानगी घेतली नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नियम १२७-अ (२) अन्वये परवानगी घेणे आवश्यक होते. तथापि सदर बाब श्री वाजे यांचे खर्च प्रतिनिधी यांना निदर्शनास आणून दिली व त्यांनी सदर बाईक रॅलीसाठी झालेला खर्च मान्य केलेला आहे.
तिसऱ्या खर्च तपासणी साठी डॉ.भालचंद्र चव्हाण जिल्हा नोडल अधिकारी खर्च नियंत्रण पथक, श्रीविजयकुमार कोळी संपर्क अधिकारी, श्री. सुरेश महंत संपर्क अधिकारी, श्री दत्तात्रेय पाथरूट सहा. जिल्हा नोडल अधिकारी, श्री एन व्ही कळसकर फिल्ड नोडल अधिकारी, श्री. प्रकाश बानकर खर्च नियंत्रण पथक, लेखांकन चमूचे नियंत्रक श्री. चैतन्य परदेशी, श्री अनिल कोमजवार सहाय्यक खर्च निरीक्षक मुख्यालय तसेच लेखांकन चमूचे प्रमुख श्री सुभाष घुगे, श्री विनोद खैरनार, श्री किशोर पवार, श्री सुनील कोतवाल, श्री प्रशांत घोलप व सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक व खर्च चमूतील इतर कर्मचारी उपस्थित होते.