इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक बिभव कुमार यांना आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी अटक केली. न्यायायलाने त्यांची जामीनची याचिका फेटाळली आहे.
दिल्ली पोलिसांच्या पथकाने बिभव कुमार यांना चौकशीसाठी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आणले आहे. त्यांना दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की बिभव कुमारला दिल्ली पोलिसांच्या पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. बिभव कुमार यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनीही सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
बिभव कुमारचे वकील करण शर्मा यांनी सांगितले, की आम्हाला अद्याप पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. आम्ही त्यांना ई-मेल पाठवून तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. पोलिसांनीही बिभव यांच्या फिर्यादीची दखल घ्यावी. पोलिसांनी अद्याप फिर्यादीची प्रत दिलेली नाही. स्वाती यांनी सीएम हाऊसमध्ये मारहाणीचा आरोप केला होता. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी बिभव कुमार विरोधात एफआयआर नोंदवला होता. तेव्हापासून दिल्ली पोलिसांचे पथक बिभव कुमारचा शोध घेत होते.