नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव,पंचवटी व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हास माधव नागपुरे (रा.सप्तशृंगी नगर,नांदूरगाव) हे मंगळवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी निलगीरीबाग भागात गेले होते. सिध्दी विनायक चौकात त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी एमएच १५ जीडी ७२९४ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत. दुसरी घटना हनुमानवाडीत घडली. कुनाल इश्वर राजपूत (रा.मैत्रपुष्प अपा.भावबंध मंगल कार्यालयाजवळ,हनुमानवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राजपूत यांची एमएच ०५ डीटी २५५५ दुचाकी गुरूवारी (दि.१६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
तिसरी घटना पोलीस परेड ग्राऊंड भागात घडली. अमोल जयराम वाभळे (रा.पोलीस मुख्यालय) यांची स्प्लेडर एमएच १७ डब्ल्यू ६९९९ गेल्या सोमवारी (दि.१३) पोलीस परेड ग्राऊंड येथे पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.