मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीड लोकसभा मतदार संघात भाजपने धमकावून बोगस मतदान व मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. या प्रकाराची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली.
निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत.
या मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी १९ गावांमध्ये फेर मतदान करण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. यात बूथ कॅप्चर केल्याचे म्हटले आहे.