इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः हरियाणात तावडू येथे शुक्रवारी पहाटे दीड वाजता भाविकांनी भरलेल्या बसला आग लागली. कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर ही दुर्घटना घडली.या आगीत आठ जण जिवंत जळाले तर २५ हून अधिक जण भाजले असून त्यापैकी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
या बसमधून साठ जण प्रवास करत होते. हे सर्वजण नातेवाइक आहेत. ते मथुरा-वृंदावनला भेट देऊन परतत होते. धावत्या बसला आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवले. स्वत: आग शमवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण समजू शकले नाही.
तावडू गावातील काही रहिवाशांनी बस पेटलेली पाहून चालकाला हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने बस थांबवली नाही. त्यानंतर मोटारसायकलवरून बसचा पाठलाग करून चालकाला माहिती दिली; परंतु तोपर्यंत आगीने बस वेढली होती.