मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४६ जागा जिंकेल असे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, आमची आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपला पराभूत करेल.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील बेकायदेशीर ‘महायुती’ सरकार हे विश्वासघात आणि षडयंत्राच्या आधारे स्थापन करण्यात आले. पंतप्रधान स्वत: त्याला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण झाली. खऱ्या पक्षांकडून पक्षाचे चिन्ह काढून घेतले गेले. हे सर्व भाजपच्या देणाऱ्या सूचनेनुसार होते असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सप, काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिरावर बुलडोझर चालवेल या विधानावर सांगितले की, आम्ही आजपर्यंत बुलडोझर वापरला नाही. निवडणूक आयोगाने भडकावणाऱ्यांवर कारवाई करावी. आमचे सरकार आल्यानंतर सर्व काही संरक्षित केले जाईल, आम्ही संविधानाचे पालन करू असेही ते म्हणाले.