इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीच्या उत्तर मतदारसंघातून ‘इंडिया’आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार प्रचार करीत असताना हार घालण्याच्या बहाण्याने जवळ येऊन त्यांच्या कानशिलात लगावण्याची घटना घडली. तसेच कन्हैया कुमार यांच्यावर शाईफेक करण्यात आली. अचानक हा प्रकार घडल्यानंतर समर्थकांनी संबंथिताला चांगलाच चोप दिला.
एक व्यक्ती कन्हैया कुमार यांच्या जवळ घालण्याच्या बहाण्याने आला आणि त्याने अचानक कानशिलातच लगावली. त्याने कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकली. कन्हैया कुमार यांच्या समर्थकांनी तत्काळ त्या तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला. हल्लेखोर जखमी झाला; मात्र कन्हैया कुमार सुखरूप आहेत. आम आदमी पक्षाच्या नगरसेवक छाया शर्मा यांच्यांशी बाचाबाची झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
कन्हैया कुमार शुक्रवारी प्रचारासाठी न्यू उस्मानपूर येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयात गेले होते. बैठकीनंतर ते ‘आप’च्या नगरसेवक छाया यांच्यासोबत खाली आले. या वेळी लोक घोषणाबाजी करीत कन्हैया कुमार यांच्याजवळ पोहोचले. पुष्पहार घालत असताना यातील एकाने त्यांना थप्पड मारली. काहींनी काळे झेंडे दाखवत ‘गो बॅक-गो बॅक’च्या घोषणा दिल्या.
काँग्रसेने या घटनेवर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी निवडणूक हरण्याच्या भीतीने आपल्यावर हल्ला करण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप कन्हैया कुमार यांनी केला. पराभवाच्या भीतीने हताश झालेल्या ईशान्य दिल्लीतील भाजप खासदारांनी आता गुंडगिरीचा अवलंब केला आहे. लक्षात ठेवा, काँग्रेस पक्ष गांधीवादी आहे, गोडसेवादी नाही. आपली ओळख घाबरणाऱ्यांची नाही, तर न्यायासाठी लढणाऱ्यांची आहे. एका सामान्य खासदारापासून ते त्यांच्या पंतप्रधानांपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत – भाजप अस्वस्थ आहे. त्याचा सुपडा ४ जून रोजी साफ होणा आहे.