नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतल्या हुकूमशहांना आडवा करण्यासाठी, युवा ताकद दाखवण्यासाठी ‘मशाल’लाच मत देण्याचे आवाहन नाशिकच्या सभेत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. दिल्लीची कितीही मोठी ताकद असो, हा महाराष्ट्र तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर होणारा अन्याय आपण विसरता कामा नये, कारण आपणही ह्याचं देशाचा भाग आहोत असेही ते म्हणाले.
आज नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे ह्यांच्या प्रचारार्थ नाशिक येथील पवन नगर मैदानात झालेल्या जाहीर सभेस युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
या सभेला लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, आमदार नरेद्र दराडे, लोकसभा समन्वयक डी. जी. सूर्यवंशी, नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, युवासेना सहसचिव सिद्धेश शिंदे, महानगरप्रमुख विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे, माकप नेते डॉ. डी. एल. कराड, शेकापचे राजू देसले यांच्यासह मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक सहभागी झाले होते.