येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भंडारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये येवला येथील कै. भाऊलाल पैलवान लोणारी राष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या युवा मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्यांच्या जोरावर सुवर्ण,रौप्य व कांस्य अशी विविध पदके पटकावली.
भंडारा येथे बारावी राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये येवला येथील कै. भाऊलाल पैलवान लोणारी राष्ट्रीय कुस्ती संकुलातील युवा मल्लांनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केली. या राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेत येवल्याच्या मल्लांनी फेरीनिहाय झालेल्या कुस्त्यांमध्ये नेत्रदीपक डावांच्या जोरावर आपल्या प्रतिस्पर्धी मल्लांवर मात केली.
या स्पर्धेत एनआयएस कोच तथा पैलवान रोहन राजेंद्र लोणारी याने प्लस १०० किलो वजन गटात सुवर्णपदक,एनआयएस कोच तथा पैलवान शिवा नामदेव बोरणारे याने ७३ किलो वजन गटात सुवर्णपदक, पैलवान आनंद संजय काळेल याने ६० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तर पैलवान वैभव माधव लोंढे याने ९० किलो वजन गटात रौप्यपदक,पैलवान सूर्यकांत शांताराम गायकवाड याने ६६ किलो वजन गटात कांस्य,पैलवान शिवा राजेंद्र शेंडगे याने ७३ किलो वजन गटात कांस्य,पैलवान ओम मोहन शेळके याने ८० किलो वजन गटात कांस्यपदकाची कमाई केली. या सर्व मल्लांची छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.