नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांद्याच्या प्रश्नावरून घोषणाबाजी करणाऱ्या तरुण शेतकरी किरण सानप याने यामागचे कारण आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले. पिंपळगावच्या या सभेत मोदी कांद्याच्या प्रश्नांवर बोलतील अशी आमची अपेक्षा होती; पण ते हिंदू -मुस्लिम आणि धार्मिक मुद्यांवरच बोलत राहिल्यामुळे माझा धीर सुटला. मी त्यांना कांद्याच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली असे त्याने सांगितले.
किरण सानप याच्या घोषणाबाजीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केले. त्यानंतर सानप यांनी आज नाशिक येथे पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर सानप यांनी पत्रकारांना या घोषणाबाजीचे कारण सांगितले.सानप म्हणाले, की मी शरद पवार यांना मानत असलो, तरी ही घोषणाबाजी करण्यासाठी मला कुणीही प्रवृत्त केले नाही. सामान्य शेतकरी असल्याने मी स्वयंप्रेरणेने कांद्याच्या प्रश्वावर बोलण्याचा आग्रह धरला.
मोदी भाषण करत असताना अचानक सानप यांनी ‘कांद्यावर बोला’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे मोदीही क्षणभर थबकले. त्यानंतर समोरून मोदी-मोदींच्या घोषणा झाल्या. मोदी यांनीही ‘जय श्रीराम’ व ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. मोदी यांनी भा।षण पुढे सुरू ठेवले. त्यानंतर सानप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकाराबाबत शरद पवार यांनी सानप यांच्या कृतीचे कौतुक केले. त्यामुळे सानप यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन नंतर पत्रकारांशी बातचीत केली.