नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीमधील नेते छगन भुजबळ नाराज असलेल्या चर्चेनंतर भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे आज तातडीने भुजबळ फार्म गेले. येथे जाऊन त्यांनी भुजबळांची भेट घेतली. काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळ नाराज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तातडीने ही भेट महाजन यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.
नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीतर्फे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीतर्फे राजाभाऊ वाजे व अपक्ष उमेदवार म्हणून शांतीगिरी महाराज रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. भुजबळांनी या निवडणुकीत गोडसे यांच्या प्रचाराता सहभाग घेतला. पंतप्रधांच्या सभेतही ते हजर होते. पण, त्यानंतर ही नाराजीची चर्चा सुरु झाली.
गिरीश महाजन यांचा वाढदिवस
भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आज भुजबळ फार्म येथे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतल्याचे भुजबळांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसानिमित्त शाल पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.