इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली येथे आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत ,चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाशिकने सीएनए पाठोपाठ लातूरवर २९८ धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. १३७ चेंडूत १५ चौकारांसह नाबाद १३६ धावा फटकवणारी डावखुरी फलंदाज श्रुती गीते विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सांगली येथील चौथ्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करत नाशिकने तिसऱ्या क्रमांकावरील श्रुती गीतेच्या नाबाद १३६ धावांच्या जोरावर ५० षटकांत ५ बाद ३४९ असा धावांचा डोंगर रचला. प्रचिती भवर व शाल्मली क्षत्रिय या सलामीच्या जोडीने फटकेबाज प्रत्येकी ४५ तर कल्याणी कुटेने ३८ धावा केल्या. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजासमोर लातूर संघ २५.४ षटकांत सर्वबाद ५१ इतकीच मजल मारू शकला. अस्मिता खैरनार व प्रचिती भवरने प्रत्येकी २ तर सिद्धी पिंगळे, शाल्मली क्षत्रिय, निकिता मोरे, कल्याणी कुटे, वैभवी बालसुब्रमणीयम व श्रुती गीते यांनी प्रत्येकी १ बळी घेत १९ वर्षांखालील नाशिक महिला संघास २९८ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
त्याआधीच्या तिसऱ्या साखळी सामन्यात सीएनए वर १६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रचिती भवर व शाल्मली क्षत्रिय या सलामीच्या जोडीच्या फलंदाजीने विजयाचा पाया रचला व सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करत नाशिकने ५० षटकांत ८ बाद २२५ धावा केल्या. प्रचिती भवरने सर्वाधिक ६३ तर शाल्मली क्षत्रियने ४२ व रागिणी सोनवणेने नाबाद २९ धावा केल्या. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजासमोर सीएनए संघ ३२ षटकांत सर्वबाद ६४ इतकीच मजल मारू शकला. डावखुरी मध्यमगती श्रुती गीते , लेग स्पिनर्स कल्याणी कुटे व कर्णधार वैभवी बालसुब्रमणीयमने प्रत्येकी २ तर शाल्मली क्षत्रिय, अस्मिता खैरनार, प्रचिती भवर व निकिता मोरे यांनी प्रत्येकी १ बळी घेत नाशिकला १६१ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
या लागोपाठ दोन विजयांमुळे नाशिकने चार सामन्यातील तिसरा विजय नोंदवत सांगली पाठोपाठ एच गटातील पाच संघांत दूसरा क्रमांक मिळवला. या साखळी स्पर्धेत नाशिकतर्फे फलंदाजीत श्रुती गीतेने ४ डावात २१८ धावा केल्या. तर गोलंदाजीत अस्मिता खैरनार, प्रचिती भवर, श्रुती गीते व वैभवी बालसुब्रमणीयम यांनी ४ डावात प्रत्येकी एकूण ६ बळी घेतले. संघ प्रशिक्षकपदाची जबाबदारी भावना गवळी यांनी पार पाडली . खेळाडूंना डॉ. भाविक मंकोडी यांचेही मार्गदर्शन लाभले.