मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान आपल्या भाषणामध्ये परस्पर विरोधी विधाने करत आहेत. भाजपाचं गणित विस्कळीत झालं आहे. चारशे पारचा नारा आता थांबला. दोनशे पार जाईल की नाही याची चिंता त्यांना सतावते आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्थापन केलेले दोन पक्ष फोडले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांना विश्वास नाही की ते निवडून येतील असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ बाजार समिती, मनमाड येथील जाहीर सभेस संबोधित केले. आपल्या हिताचे प्रश्न संसदेत मांडणाऱ्या भगरे सरांचा विजय निश्चित आहे, हे अधोरेखित करणारी ही प्रचंड सभा झाली. टोपी घालणारी आमची जुन्या पिढीतली माणसं देखील पवार साहेबांवरील गाण्यावर नाचली. पवार साहेबांवर हा जिल्हा किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. या सभेत शरद पवार यांच्यासह राजेश टोपे, महेबुब शेख, सक्षणा सलगर, नितेश कराळे यांच्यासह महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते उपस्थितीत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षात आपल्याला विविध पद्धतीने लुबाडलं, आपल्यावरील करांचं ओझं वाढवलं, जीवनावश्यक सर्व वस्तूंपासून ते शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतकी अवजारांवर जीएसटी लावला. त्याचा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना भुर्दंड भरावा लागतो.
नाशिक जिल्ह्यात वळण बंधारे बांधून पाणी कसे आणता येईल यासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना पवार साहेबांनी सखोल अभ्यास केला. मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की, महाराष्ट्रात आपले सरकार आल्यावर पडेल ती किंमत देऊन या भागात पाणी आणण्याचे काम आम्ही करू.