सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोदी साहेब येतात आणि आमच्यावर टीका करतात. त्यांनी टीका केल्यावर आमच्या अंगावर काही भोकं पडत नाहीत, तुम्ही खुशहाल टीका करा, आम्हाला त्याची चिंता नाही. पण आमची चिंता ही आहे की शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध कसे होईल, यासंबंधीचा तुमचा कार्यक्रम काय आहे? तो पहिल्यांदा या ठिकाणी सांगा. ते सांगत नाहीत, शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. शेतीमालाच्या किमती वाढवू म्हणून सांगितलं, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून म्हणून सांगितलं, खतांच्या किमती कमी करू म्हणून सांगितलं हे काहीच त्यांनी केलं नाही. आज तुम्ही जे पिकवता त्याला चांगली किंमत मिळत नाही आणि जो तुमच्या मेहनतीची किंमत तुम्हाला देत नाही, त्याला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही हा निकाल तुम्हाला आणि मला घ्यावा लागेल, त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितले.
धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॅा. शोभ बच्छाव यांच्या प्रचारासाठी ते सटाणा येथे आले. यावेळी जाहीर सभेत त्यांनी थेट मोदी सरकारवर हल्ला केला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, दिनेश अहिरे, शिरीष कोतवाल, महेबुब शेख, सक्षणा सलगर, नितेश कराळे हे उपस्थितीत होते.
यावेळी ते म्हणाले की, देश संकटातून जातोय, वेगवेगळी संकट येत आहेत. नाशिक जिल्ह्याचा एक इतिहास आहे, तुम्हाला किंवा जुन्या पिढीला आठवत असेल. त्यावेळेला चीनने आक्रमण केलं भारताचा पराभव झाला, देश पुन्हा सावरायचा होता, जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जवाहरलाल नेहरू यांनी निकाल घेतला, की चीन पासून हा देश सावरायचा असेल तर या देशाच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढू शकेल, असा संरक्षण मंत्री त्या ठिकाणी असला पाहिजे, आणि त्यांनी निवड केली यशवंतराव चव्हाण यांची. यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री झाले. मला अभिमान आहे, तुम्हा लोकांचा, नाशिककरांचा की देशाच्या पार्लमेंटमध्ये काम करण्यासाठी, जवानांना आत्मविश्वास देण्यासाठी, संरक्षण करण्याची शक्ती वाढवण्यासाठी चव्हाण साहेब दिल्लीला गेले, याच नाशिक जिल्ह्याच्या लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून दिलं, हा या देशाचा इतिहास आहे. त्यांनी सैन्याचा आत्मविश्वास वाढवला, अनेक गोष्टी केल्या. इथे कारखानदारी नव्हती, शेतीला लागणाऱ्या गोष्टी आपण पिकवतो, पण संरक्षणाला लागणाऱ्या गोष्टी या ठिकाणी होत नव्हती, चीनशी लढायचं होतं. यशवंतराव चव्हाण यांनी निकाल घेतला आणि निफाडच्या जवळ विमान तयार करण्याचा कारखाना काढला. या देशात मीग तयार करण्याचा आणि या देशाचे रक्षण करण्याची ताकद असलेला कारखाना या नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी काढला आणि जगामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे हा इतिहास त्या ठिकाणी केला. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या नाशिकच्या परिसरामध्ये घडलेले आहेत, ते घेऊन आपण पुढे जायचंय.
पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधी नेहरू यांच्या विचारांनी हा देश चालवला पाहिजे, इंदिरा गांधी यांच्या विचारांनी हा देश चालवला पाहिजे, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी हा देश चालवला पाहिजे. नरेंद्र मोदी हे करू शकत नाहीत. आज देशाच्या सीमेवर जवळपास ३ हजार किलोमीटर आपली जागा चीनने ताब्यात घेतलेली आहे. अरुणाचल नावाचं राज्य आहे, त्याच्या सीमेवर चीनने रस्ते केलेले आहे, त्या ठिकाणी घर बांधलेली आहेत आणि या देशाच्या संरक्षणाला धोका पोहोचेल, असं काम त्या ठिकाणी केलं आहे. पण अखंडपणाने विरोधकांना शिवीगाळ देणारे मोदी हे विरोधकांचा, परकीयांचा जो उद्योग चालू आहे, देशाच्या सीमेवर त्यापासून देशाचे रक्षण करायला त्यासाठी ठोस पाऊल टाकण्याची गरज आहे ती टाकण्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. म्हणून आज देशाचा शेतकरी अडचणीत आहे, देशाचा सामान्य माणूस अडचणीत आहे, परकीयांकडून एक प्रकारच्या आक्रमणाची शक्यता ही सगळी स्थिती आज आपल्याला बघायला मिळते, ती जर बदलायची असेल तर काम एकच आहे की या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव करणे आणि त्यासाठी डॉ. शोभा बच्छाव यांना मोठ्या मतांनी विजयी करा, त्यांच्या खुणेच्या समोरच्या बटन दाबा आणि एक नवीन इतिहास घडवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण मिळून करू असे आवाहन त्यांनी केले.