नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किरकोळ वादातून तीन जणांच्या टोळक्याने ४७ वर्षीय परप्रांतीयास बेदम मारहाण केल्याची घटना द्वारका भागात घडली. या घटनेत काही तरी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने परप्रांतीय इसम जखमी झाला असून या हाणामारीत त्याच्या खिशातील मोबाईलसह रोकड व महत्वाचे कागदपत्र गहाळ झाले आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू गायकवाड व त्याचे दोन साथीदार अशी परप्रांतीयास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत तेजेंद्र करणा बहादूर सोनार (मुळ रा. नेपाळ हल्ली कृषी भवन, एनडीसी बँकेजवळ, द्वारका) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तेजेंद्र सोनार सोमवारी (दि.१३) रात्री कृषी भवना भागात देखभालीचे काम करीत असतांना ही घटना घडली. संशयितांनी त्यांना गाठून किरकोळ कारणातून वाद घातला.
यावेळी संतप्त संशयित त्रिकुटाने शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हाणामारीत काही तरी हत्यार मारण्यात आल्याने तेजेंद्र सोनार जखमी झाले असून या हाणामारीत त्यांच्या खिशातील मोबाईल साडे आठ हजाराची रोकड व एटीएम कार्ड गहाळ झाले आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिदे करीत आहेत.