नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय तटरक्षक दलाने, बेकायदेशीर डिझेल तस्करी करणारी ‘जय मल्हार’ ही मासेमारी नौका आणि तिच्यावरच्या पाच जणांना महाराष्ट्र किनाऱ्याजवळ 16 मे 2024 रोजी ताब्यात घेतले. तपासामध्ये सुमारे 27 लाख रुपये किमतीचे बेहिशोबी पाच टन डिझेल आणि प्रतिबंधित अंमली पदार्थ अल्प प्रमाणात जप्त करण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेली नौका, पोलीस, सीमाशुल्क आणि मत्स्योद्योग विभागाकडून चौकशी करण्यासाठी मुंबई बंदरावर आणण्यात आली. नौकेवरील व्यक्तींनी आधीच 5,000 लिटर इंधन मच्छीमारांना समुद्रात विकल्याचे पुढील तपासात उघड झाले.
या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेल तस्करी रोखण्यात भारतीय तटरक्षक दलाला आणखी यश प्राप्त झाले आहे. गेल्या तीन दिवसात 55,000 लिटर बेहिशोबी डिझेल जप्त करण्यात आले आहे.देशाच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि किनारपट्टीच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी त्वरित आणि समन्वित कृतींच्या महत्त्वावर भर देत, सागरी क्षेत्रात बेकायदेशीर गतिविधींना पायबंद घालण्यासाठी सदैव प्रतिबद्ध असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.