जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 तर मद्य प्राशन करुन धुमाकूळ घातल्या प्रकरणी 01 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाधिकृतपणे बंदी असलेला गुटखा व मद्याची वाहतूक केल्या प्रकरणी 07 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याकालवधीत 08 लक्ष 65 हजार 100 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर 05 लक्ष 19 हजार 787 रुपयाचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीत आचार संहिता भंग तसेच निवडणूकीवर परिणाम करू शकतील असे अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी जिल्हाभरात मोठी कामगिरी केली आहे. त्यात जामनेर येथे विनापरवानगी प्रचार सभा घेतल्या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यासोबतच अवैधपणे गांज्याची वाहतूक, प्रतिबंध असलेल्या गुटख्याची वाहतूक तसेच अवैधरित्या मद्याचे वाहतूक, निवडणूकी विषयी विनाकारण अफवा पसरविणे, मद्य प्राशन करुन निवडणूक कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणे तसेच ईव्हीएम मशिन्सचे प्रात्यक्षिक सुरु असतांना विनापरवानगी छायाचित्र काढणे याबाबतीत जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भडगांव, पाचोरा, पहूर, जळगांव तालुका, पारोळा, मलकापुर या पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या नाका तपासणी पथकाला एम.एच.19 सी.झेङ 8569 या कारमध्ये 08 लक्ष 65 हजार 100 रुपये आढळुन आले आहे. या प्रकरणी तक्रार जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्यात 01 हजार 989 मतदान केंद्रावर करण्यात आले वेब कास्टिंग
जिल्ह्यातील जळगांव व रावेर या दोनही मतदार संघातील 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिये दरम्यान घडणारे अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रथ्मच वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आलेली होती. या वेब कास्टिंगचे लाईव्ह प्रसारण पाहणेसाठी अल्प बचत भवन येथे स्वतंत्र कंट्रोल रुम उभारण्यात आले होते. जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात 01 हजार 989 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कास्टिंग करण्यात आले. त्यात जळगांव लोकसभा मतदार संघातील जळगांव शहर विधानसभा मतदार संघात 182 मतदान केंद्रे, जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघात 170 मतदान केंद्रे, अमळनेर विधानसभा मतदार संघात 160 मतदान केंद्रे, एरंडोल विधानसभा मतदार संघात 145 मतदान केंद्रे, चाळीसगांव विधानसभा मतदार संघात 170 मतदान केंद्रे, पाचोरा विधानसभा मतदार संघात 166 मतदान केंद्रे असे एकुण जळगांव लोकसभा मतदार संघात 993 मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात आले.
तर रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदार संघात 160 मतदान केंद्रे, रावेर विधानसभा मतदार संघात 150 मतदान केंद्रे, भुसावळ विधानसभा मतदार संघात 207 मतदान केंद्रे, जामनेर विधानसभा मतदार संघात 165 मतदान केंद्रे, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात 162 मतदान केंद्रे, मलकापुर विधानसभा मतदार संघात 152 मतदान केंद्रे असे एकुण रावेर लोकसभा मतदार संघात 996 मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात आले.
तर, जळगांव लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील सुश्म हालचाली टिपण्यासाठी जळगांव लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर एकुण 262 सुश्म निरीक्षक नेमण्यात आले होते, तर लोकसभा मतदार संघात 528 सूक्ष्मनिरीक्षकांची नेमणुक करण्यात आलेली होती.