नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपघाताची मालिका सुरुच असून शहर परिसरातील वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दोन अपघातात रिक्षाचालकासह ५४ वर्षीय पादचा-याचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आले आहेत.
पहिला अपघात अंबड औद्योगीक वसाहतीतील कोकाकोला कंपनी भागात झाला. या अपघातात संजय कारभारी आंबेकर (५४ रा.दामोधर चौक,पाथर्डी फाटा) या पादचा-याचा मृत्यू झाला. आंबेकर मंगळवारी (दि.१४) रात्री अंबड औद्योगीक वसाहतीतील कोकाकोला कंपनी भागातून रस्त्याने पायी जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ऋषीकेश महाले (रा.नांदूरनाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरा अपघात आनंदवली येथे झाला. नाशिक जवळली पळसे येथील सुजीत रमेश चंद्रमोरे हे रिक्षाचालक बुधवारी (दि.१५) आनंदवली येथे गेले होते. जलालपूर येथे जाण्यासाठी आनंदवली गावात ते रस्त्याच्या कडेला आपल्या ताब्यातील रिक्षा पार्क करून ते आपल्या मित्राची वाट बघत होते. रस्त्याच्या कडेला उभे असतांना भरधाव आलेल्या मिनी मालवाहू इलेक्ट्रीक टेम्पोने त्यांना धडक दिली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने असतांना हा अपघात झाला.
या वाहनाने चंद्रमोरे यांना उडवित पुढे उभे असलेल्या दोन दुचाकींनाही धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक चंद्रमोरे यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी राजेंद्र निवृत्त जाधव (रा.जलालपूर ता.जि.नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक शरद नाना पाटील (रा.कामगारनगर) याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नेहा सोळंके करीत आहेत.