इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद : गुजरातमधील जुनागड येथे एक भयानक घटना घडली आहे. आईने अंघोळीसाठी बोलवले असता आंघोळ टाळण्याच्या प्रयत्नात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला, कारण हा चिमुकला एका कारमध्ये जाऊन लपला. पण त्यानंतर त्याला कारमधून बाहेर पडता आले नाही, त्यामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तो बेशुद्ध अवस्थेत सापडला
जुनागड शहरात रवींद्र भारती नावाचे ग्रहस्थ राहतात, त्यांचा पाच वर्षाचा चिमूरडा आदित्य हा सकाळी आंघोळ करण्यास नकार देत होता, आईने वारंवार बोलवूनही तो अंघोळीसाठी तयार होत नव्हता. इकडे तिकडे पळताना तो घराबाहेर कारखान्यात असलेल्या एका कारमध्ये लपून बसला, मात्र तो आत बसताच क्षणी कारचा दरवाजा बंद झाला आणि आदित्य कारमध्ये अडकला. मुलगा घरातून गायब झाल्याने पालकांनी खूप शोधाशोध केली. पण आदित्यचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता कारखान्यातील एका कारमध्ये आदित्य लपून बसल्याचे निदर्शनास आले, यानंतर पालकांनी आदित्यला गाडीतून बाहेर काढले, पण तो बेशुद्ध पडला होता.
आंघोळीचा नकार जीवावर बेतला
अनेक लहान मुलांना आंघोळ करणे आवडत नाही, आंघोळीसाठी ते नेहमीच नकार देतात. आदित्यचेही असेच झाले परंतु ते त्याच्या जिवावर बेतले. पालकांनी त्याला तातडीने जुनागढ येथील रुग्णालयात दाखल केलं. पण त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला राजकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी आदित्यचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू गुदमरून झाल्याचं घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे. मात्र या प्रकारामुळे घरच्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
Stuck in the car.. The child died of suffocation…