नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगावच्या सभेत नकली शिवसेना म्हणत उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर सायंकाळी उध्दव ठाकरे यांनी त्यावर प्रत्युत्तर देत सांगितले की, मला कुणीतरी सांगितले की मोदी झोपतच नाही. झोपलं नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखं बोलायला लागतात. मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात असे सांगत उद्धव ठाकरेंनी प्रत्त्युत्तर दिले.
नाशिक लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ) येथे पार पडलेल्या या सभेत मोदी गर्दी होती. या सभेत त्यांनी नकली सेना काँग्रेसमध्ये सामील होईल या मोदींच्या विधानालाही उत्तर दिले. आतापर्यंत भाजप बरोबर इतक्या दिवस राहून तुमच्यात सामील झालो नाही तर काँग्रेसमध्ये कसे होवू असे सांगत त्यांनी मोदींचा मुद्दाही खोडून काढला.
या सभेत बोलतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, भाजपला राजकारणात पोरंच होत नाहीत म्हणून त्यांना नकली संतान, गद्दार मांडीवर घ्यावे लागलेत. शेतक-याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असे आदेश देणारे महाराज कुठे आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतक-यांना अडकवून ठेवणारे नतद्रष्ट सरकार कुठे? असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी मोदीजी महाराष्ट्र आज जाहीर करतोय की ४ जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान नसाल.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ह्यावेळी, ‘माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल, त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही; ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत.’ असा थेट इशारा दिला.
सभेस शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच इंडिया – महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
.