वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंतच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी अल्पसंख्यांक लोकांवर भाष्य करायला घेतले आणि सभेतील एका निर्भिड शेतकऱ्याने प्रश्न केला ते सगळं राहू द्या. कांद्यावर बोला… या शेतकऱ्याचा आवाज दाबण्यासाठी त्याला बाजूला करण्यात आले आणि साहेबांवर घोषणा सुरू झाल्या. खरतर त्या शेतकऱ्याला बोलू द्यायला हवं होतं. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, एक संधी द्या म्हणून विनंती करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सर यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी येथील जाहीर सभेत पाटील हे बोलत होते. यावेळी ते म्हणाीले नाशिक जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे आणि त्यामुळेच प्रतिकूल परिस्थिती असताना देखील मागच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आपले पाच आमदार या जिल्ह्यातून निवडून दिले. आता लोकसभेसाठी भगरे सर निवडून यावेत याकरिता आपले कार्यकर्ते पदरचे पैसे खर्च करून दिवस-रात्र एक करून त्यांना पाठबळ देत आहेत.
यावेळी ते म्हणाले की, भागातील पाण्यावर गुजरातचा डोळा आहे. आपल्या हक्काचं पाणी जर आपल्याला टिकवायचं असेल तर जागरूकतेने उभं राहावं लागेल. भगरे सर यांना संसदेत पाठवून आपल्याला पाण्यासाठी लढलं पाहिजे. मी या खात्याचा मंत्री होतो तेव्हा गुजरातला तीन पत्रे पाठवली. पण त्याचा प्रतिसाद आला नाही.