नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जमिन व्यवहाराचे खोटे आमिष दाखवून एकाने दहा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. टोकन घेवूनही व्यवहार पूर्ण न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल सुरेश दिंडे (रा.गंजमाळ) असे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत जितेंद्र दत्तात्रेय गुळवे (रा.मानिकनगर,गंगापूररोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दिंडे याने दिंडोरी तालुक्यातील धागूर येथे शेत जमिन असल्याचे भासवून ही फसवणुक केली. शेत गट नं. १२ क्षेत्र २० आर या जमिन विक्रीचे आमिष दाखवून संशयिताने गुळवे यांच्याशी व्यवहार केला होता. हा व्यवहार गेल्या १४ एप्रिल रोजी विद्या विकास सर्कल भागात झाला होता.
या व्यवहारात टोकन म्हणून पाच लाख रूपयांची रोख रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर दिंडोरी येथे पाच लाख रूपयांची रक्कम स्विकारली होती. मात्र त्यानंतर संशयिताने व्यवहारास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.