इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – देशभरात अनेक महामार्ग, टनेल्सची कामे होत आहेत. मी एकदा एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करतोच. होणार नसेल तर तसे आधीच सांगतो. पण देशासाठी प्रत्येक काम ‘ओनरशीप’ घेऊन करतो. प्रत्येकाने हीच वृत्ती बाळगली तर सगळी कामे व्यवस्थित पूर्ण होतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवार केले.
सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रशांत दामले यांचे खुमासदार प्रश्न आणि त्याला गडकरी यांची दिलखुलास उत्तरे अशी जवळपास सव्वा तास ही मुलाखत रंगली. एवढी कामे केल्यानंतरही रात्री झोपताना ‘आता कुठला रस्ता राहिला असेल?’ असा प्रश्न मनात येतो का, या प्रश्नावर गडकरी यांनी भूमिकेशी आणि कामाशी प्रामाणिक असल्याचे सांगितले. ‘प्रभाकर पणशीकरांची नाटके मी बघितली आहेत. ते एका नाटकात औरंगजेबाची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारायचे. मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक असल्याचे ते कायम सांगायचे. माझेही तेच आहे. मी माझ्या भूमिकेशी आणि कामाशी प्रामाणिक आहे,’ असे गडकरी म्हणाले.
यावेळी आवडती गाणी, आवडती नटी, खवय्येगिरी, नाटकांची आवड, आवडते पर्यटनस्थळ आदी विषयांशी संबंधित प्रश्नांवर गडकरी यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली. यावेळी विष्णूदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा गडकरी यांनी विशेष सत्कार केला. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने ‘मनातले गडकरी’ हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गडकरी यांच्या कारकिर्दीचा व कार्याचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले.
कार्यकर्ताच माझा राजकीय वारसदार
आपला राजकीय वारसदार कोण असेल, या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी माझ्या पक्षातील कार्यकर्ताच माझा राजकीय वारसदार असणार आहे, असे सांगितले. ‘माझ्या पक्षातील ज्या कार्यकर्त्यांच्या श्रमाच्या जोरावर मी येथवर पोहोचलो. त्यामुळे कार्यकर्त्यांचाच पहिला हक्क आहे,’ असेही ते म्हणाले.