नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाच लाखाच्या कर्जापोटी दोन वर्षात साडे तेवीस लाखाची परतफेड करूनही व्याजापोटी सात लाख रूपये खासगी सावकाराने स्विकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घराच्या कागदपत्राची मागणी केल्याने संशयिताने व्याजाची मागणी करीत थेट कुटूंबियांनी मारण्याची धमकी दिल्याने कर्जदार महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगला अहिरे उर्फ मंगला गायकवाड, पती दिपक गायकवाड (रा.दोघे साई शिल्प अपा.शिवगंगानगर,म्हसरूळ), भोजूसिंग गिरासे व अन्य एक जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सावकारांची नावे आहेत. याबाबत उन्नती योगेश जैन (रा.शिवगंगानगर,म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. जैन कुटूंबियानी आर्थिक चणचण असल्याने २०२२ मध्ये संशयितांकडून ५ लाख ९ हजार २०९ रूपयांची रोकड टप्याटप्याने कर्जाने घेतली होती. या पोटी जैन यांच्या पती कडून संशयितांनी गेल्या दोन वर्षात २३ लाख ५४ हजार ८०५ पाच रूपयांची बेकायदा वसूली केली.
मुळ रक्कम वगळता साडे १८ लाख रूपयांची रक्कम व्याजापोटी वसूल करण्यात आल्याने जैन यांनी तारण म्हणून ठेवलेल्या घराच्या कागदपत्रांची मागणी केली असता संशयितांनी वेगवेगळया रकमांना १० ते २० टक्के दराचे व्याज लावून अधिकच्या सात लाख रूपयांच्या व्याजाच्या रकमेची मागणी केली. जैन यांनी आता पैसे देवू शकत नसल्याचे सांगताच संशयितांनी घरी येवून शिवीगाळ करीत कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.