नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलिसांनी सकाळपासूनच त्यांना पोलिस ठाण्यात नजरकैद ठेवले. सुटका झाल्यानंतर त्यांनी मोदी देशातील उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना का भेटत नाही असा प्रश्न केला आहे.
काल मंगळवार दिनांक १४ रोजी दुपारी पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी घरी जाऊन भारत दिघोळे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. काल रात्रभर श्री दिघोळे यांच्या नाशिकस्थित निवासस्थानी पोलिस निगराणी ठेवण्यात आली होती. तर आज सकाळीच एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे हवालदार भगवान शिंदे, रोशन गायकवाड, प्रकाश उंबरकर यांनी भारत दिघोळे यांना घरातून ताब्यात घेतले. व सिन्नर पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले. दिवसभर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या निगराणीत असलेल्या भारत दिघोळे यांना सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा संपल्यानंतर सोडून देण्यात आले.
मोदी शेतकऱ्यांना का भेटत नाही…
देशातील उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेटत नाही. कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच आपले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाही. हे निश्चितच शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कांद्यावरील निर्यात बंदी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सुरू करावी आणि कांदा निर्यात बंदीपासून मागील नऊ महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी पोटी दरातील फरक म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे.
भारत दिघोळे , अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना