इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होण्याअगोदर कल्याणमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मानापमान नाट्य रंगले. जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर जागा न देता आमदार, शहरप्रमुखांना तसेच इतर पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.
वर्षभरापूर्वी मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. मोरे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करत होते. मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर जागा न दिल्याने मोरे नाराज होते. मोरे यांनी शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आणि राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.
कल्याणमध्ये मोदी यांच्या या सभेसाठी व्यासपीठांवर निमंत्रित पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुखांना निमंत्रण नाही. आमदार, शहरप्रमुख हे व्यासपीठावर निमंत्रित असताना शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता; पण जाणीवपूर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आहे