इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मराठ्यांच्या आरक्षणावरून मराठा आणि कुणबी या दोघांच्या वादात सरकार चांगलेच अडकले आहे. याचा फायदा सरकारला होणार की मराठ्यांना, याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. रोज सरकारमधील मंत्री आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. आता नारायण राणेंच्या एका विधानावरून मनोज जरांगे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिले आहे.
नारायण राणे यांच्या एका विधानावरून सारा वाद निर्माण झाला होता. ‘मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सांगतात. पण, तसे काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत. ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही,’ असे नारायण राणे म्हणाले होते.
त्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय आहे? आपण आपल्या आजोबा-पणजोबांच्या रक्ताचे आहोत की नाही? आपले आजोबा-पणजोबा अडाणी होते बिचारे. आता आपण सुशिक्षित झालो, त्यानेच आपल्याला शिकवले. रात्रंदिवस काबाड कष्ट केले, आपल्याला सुशिक्षित केले. ते आपले आजोबा, पणजाबो, खापरपणजोबा स्वतःला कुणबी समजायचे. मुलगी बघयाला गेले आणि कोणी विचारले की तुमचा मुलगा काय करतो तर ते म्हणायचे आमचा मुलगा एकटा पंधरा एकर शेती करतो.’
मराठे खंबीर आहेत
७५ वर्षांत राजकीय पक्षांना, नेत्यांना मोठं करण्याकरिता मराठा समाजाने खस्ता खाल्ल्या आहेत. तुम्हाला उपकार फेडायचे नसतील तर नका फेडू पण, आरक्षणाला विरोध करू नका. ते मिळवण्याकरता मराठे खंबीर आहेत, असा इशारा जरांगे यांनी नारायण राणे यांना दिला.
आयुष्याची माती करू नका
पूर्वी घराला वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणतात मग झोपणे बंद करायचे का? सुधारित शब्दाला अडचण काय आहे? तुम्हाला घ्यायचे असेल प्रमाणपत्र तर घ्या नाहीतर घेऊ नका. तुम्हाला जबरदस्ती केली का कोणी? पण गोरगरिबांच्या लेकरांना घेऊ द्या. त्यांच्या आयुष्याची माती करू नका, असेही जरांगे म्हणाले.