मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी एनडीएच्या नेत्यांची यावेळी उपस्थितीत होते. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी जिरेटोप मोदींच्या डोक्यावर परिधान केला होता. त्यानंतर हा वाद पेटला. शरद पवार गट, ठाकरे गट यामुळे आक्रमक झाले. तर विविध संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत यापुढे काळजी घेऊ असे म्हटले आहे.
काल राष्ट्रवादी शरद पवार गटाने म्हटले की, जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केल्याची टीका केली होती. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही असेही म्हटले आहे.