लासलगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथील सभेअगोदर कांद्याचा प्रश्नामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले. यावेळी मोदी सरकार हाय हाय…शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेती मालाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळासह १५ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर शेतकरी व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटीसा दिल्या आहे.