इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे, तर दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे.
गांजा तस्करीमध्ये सहभाग असलेल्या पोलिस हवालदार रोशन उगले याला बडतर्फ करण्यात आले आहे. २०२१ मध्ये रोशनला त्याच्या पत्नीसह ओडिसामधून गांजाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. युवराज राठोड आणि आदित्य यादव या दोन पोलिसांना कर्मचाऱ्यांना सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाचे हे आहे कारण
पुणे जिल्ह्यातील निवडणुकीसाठी नागपुरातून रेल्वेने काही पोलिसांना पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या वेळी युवराज राठोड आणि आदित्य यादव यांनी रेल्वेमध्ये मद्यप्राशन करत महिला पोलिसासोबत आक्षेपार्ह वर्तन केले होते. दरम्यान, याचे चित्रीकरण इतर पोलिसांनी मोबाइलमध्ये कैद केले होते. कालांतराने हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलिस प्रशासनासह शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ पोलिस आयुक्तांपर्यंतही पोहोचल्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी दोघांनाही निलंबित केले.