जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ४ जूनपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली.
जरांगे पाटील यांची नारायणगडावर सभा होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते सगेसोयरेची मागणी पुन्हा लावून धरणार आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाची माहिती देताना भाजपवर निशाणा साधला. मराठ्यांमुळे मोदी यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ मोदी यांच्यावर फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमुळे आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
जरांगे पाटील म्हणाले, की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही. मात्र जोपर्यंत सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. तसा निर्णय झाला नाही, तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांन दिली. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या, तर आम्ही राजकारणात पडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही किंवा कोणालाही निवडून आणा, असे म्हणालेलो नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता; मात्र मी समाजाला कोणाला पाडायचे ते पाडा असे, म्हणालो होतो. त्यामुळे कोणाला पाडायचे हे समाजाला कळाले होते, असे ते म्हणाले.