इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
करदात्यांनी दाखल केलेली आयकर विवरणपत्रके व त्यात नमूद केलेल्या विविध स्त्रोतांचे उत्पन्न हे आयकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीशी अचूक साधर्म्य असणारे असावे, जेणेकरून भविष्यात कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. याकरिता, आयकर विभागाने देखील मोठे पाऊल उचलले असून, करदात्यांसाठी त्यांच्या वार्षिक माहिती पत्रकाचे बाबतीत नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारत सरकारचे वित्त मंत्रालय, महसूल विभाग केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, नवी दिल्ली यांनी दि. १३ मे २०२४ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार वार्षिक माहिती विवरणपत्र अर्थातच एआयएस (AIS) हे सर्व नोंदणीकृत प्राप्तिकरदात्यांना (करदात्यांना) अनुपालन पोर्टल द्वारे, ई-फायलिंग संकेतस्थळावर www.incometax.gov.in यावर उपलब्ध आहे.
वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) करदात्याने मोठ्या प्रमाणात केलेल्या आर्थिक व्यवहारांचे बाबतीत करदात्यांसाठी त्यांची तपशीलवार माहिती प्रदान करत असते. ज्यामध्ये, करासंबंधीचे परिणाम असू शकतात. आयकर विभागाकडे विविध माहिती व विविध स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या आर्थिक डेटा च्या आधारावर अशी वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) करदात्यांना, आयकर वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. यापुढे, अशा वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) मध्ये, करदात्याला त्यात उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्यवहारावर अभिप्राय देण्यासाठी सुसज्ज कार्यप्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहितीच्या व विविध स्रोताद्वारे प्रधान केलेल्या माहितीच्या अचूकतेवर टिपणी करण्यास करण्यास हा अभिप्राय मदत करतो.
वार्षिक माहितीपत्रकात यदाकदाचित चुकीची माहिती आढळल्यास करदात्याला अशा माहिती बाबत आयकर विभागाकडे योग्य तो खुलासा करण्याचे अधिकार करदात्याला यामुळे मिळणार आहेत. अर्थातच त्यामुळे करदाता त्याचे आयकर विवरण पत्रक अचूक पद्धतीने आयकर विभागाकडे सादर करू शकतो. आपले विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी, करदात्याने आयकर वेबसाईटवरील एआयएस किंवा टीआयएस मधील दर्शवलेली माहिती योग्य आहे किंवा नाही याची शहनिशा करून घेणे करदात्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. आपल्याला हे सुद्धा माहित असावे की, कर कपात करणारे/संकलक आणि करविषयक अहवाल (डिडक्टर) देणाऱ्या संस्थांद्वारे सदरच्या माहितीची पुष्टी करण्याचे काम सध्या आयकर विभागाकडे सुरू आहे.
आयकर विभागाने माहिती पुष्टीकरण प्रक्रियेची स्थिती दाखविण्यासाठी AIS मध्ये एक नवीन कार्यप्रणाली आणली आहे. करदात्यांच्या अभिप्रायांवर, स्रोतांनी उचित कारवाई केली आहे की नाही; आयकर विभागाकडे विविध स्रोतांद्वारे मिळालेली, उपलब्ध झालेली माहिती, प्रत्यक्ष अंशत: किंवा पूर्णपणे स्वीकारून किंवा आंशिक किंवा पूर्ण स्वीकृतीच्या बाबतीत संबंधीत स्रोत्यांद्वारे माहिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. हे सर्व या कार्यप्रणालीत दाखविले जाईल. या कार्यप्रणाली मध्ये करदात्यांनी केलेल्या अभिप्राय स्थितीचे स्रोतांकडून पुष्टीकरण केल्याबाबत ची माहिती दाखवून देणे हा मुख्यतः विशेष उद्देश आहे.
अशा माहितीबाबत पुष्टीकरणासाठी
करदात्याने त्यावर दाखल केलेल्या अभिप्रायाबाबत आयकर विभागाकडून देखील करदात्याला त्या बाबत कळविले जाणार आहे हा एक मोठा फायदा आहे. आणि अशा परिस्थितीत आयकर विभागाकडून करदात्याला त्याने सादर केलेल्या माहिती बाबत व दिलेल्या अभिप्राय बाबत योग्य तो खुलासा आयकर विभागाकडून वेबसाईटवर करण्यात येणार आहे. करदात्याने दाखल केलेली माहिती योग्य आहे किंवा नाही याची पडताळणी आयकर वेबसाईटवर केली जाऊन त्याचा देखील खुलासा करत आपल्याला प्राप्त होत असल्यामुळे यापुढे आयकर विवरण पत्र दाखल करण्यापूर्वी करता त्याने जागरूक राहणे गरजेचे आहे.
या सुविधेमुळे करदात्याने आयकर विवरण पत्रक दाखल करण्यापूर्वी योग्य त्या करसल्लागारांचा सल्ला घेऊन आपले आयकर विवरण पत्रक सदोष पद्धतीने दाखल होईल याची दक्षता घेणे त्याचे कर्तव्य आहे. या सुविधेमुळे आयकर विवरण पत्रकामध्ये पारदर्शकता वाढू शकेल व आयकर विभागाचे सुयोग्य अनुपालन घडू शकणार आहे.
आयकर विवरणपत्रात पारदर्शकता वाढेल –
आर्थिक वर्ष २०२३-२४ चे आयकर विवरणपत्र भरण्यासाठी लगबग सुरू असून आयकर विवरणपत्रक दाखल करण्यापूर्वी करदात्याने आर्थिक बाबींशी संबंधित विशिष्ट गोष्टीची शहनिशा केली पाहिजे. यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर AIS व TIS ची सेवा उपलब्ध करून दिली आहे. करदात्याने आर्थिक वर्षात केलेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांची माहिती या वार्षिक माहिती विधान पत्रकात (AIS) समाविष्ट करण्यात येत असते. करदात्यांना अजून चांगल्या सेवा प्रदान करण्यात यावी या उद्देशाने आयकर विभागाकडून ही नवी तरतूद करण्यात आल्याचे दिसून येते. जेणेकरून, आयकर वेबसाईटवरील AIS अथवा TIS मधील माहितीमध्ये असलेल्या कोणत्याही तफावतीबाबतीत करदाता यापुढे, वेबसाईटवर योग्य तो खुलासा देऊ शकेल. जेणे करून भविष्यात कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही. करदात्यांनासुद्धा आपण सादर केलेल्या माहिती पडताळणी बाबत प्रक्रियेची स्थिती पाहता येणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कामकाज अधिक सोपे होणार आहे. करदात्यांनी त्यांच्या व्यवहारांची ऐच्छिक परिपूर्तता करून उत्पनाचे योग्य मूल्यमापन करून करदायित्व भरले पाहिजे.
योगेश भास्कर कातकाडे (कर सल्लागार)
आयकर विवरणपत्रक दाखल करण्यापूर्वी, एआयएस मधील माहिती दुरुस्त करता येऊ शकेल –
आयकर विभागाने हाती घेतलेल्या आयकरातील नवनवीन तरतुदीबाबत कार्यवाहीची सुरुवात केली असून, करदात्यांसोबतच, करसल्लागार, सीए यांच्यासाठी नवनवीन तरतुदी बाबत माहिती जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने रिटर्नची प्रक्रिया वेळेत व सुलभ करण्यासाठी, सुरू केलेल्या या नवीन प्रणालीमुळे करदात्यांना AIS मध्ये विविध स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या, आर्थिक डेटाच्या आधारे व्यवहारांची माहिती उपलब्ध करून देतानाच, स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीच्या अचूकतेवर तसेच चुकीच्या अहवालाबाबत करदात्याला टिप्पणी करण्यास मदत होणार आहे. करदात्यांच्या अभिप्राय नुसार, त्याची संबधीत आर्थिक व्यवहारांची माहिती अंशतः किंवा पूर्णपणे स्वीकारून किंवा नाकारून स्त्रोताद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. आंशिक किंवा पूर्ण स्वीकृतीच्या बाबतीत, स्त्रोताकडून माहिती दुरुस्त करणेबाबत करदात्याला दिल्या गेलेल्या या अधिकारामुळे करदात्याची अचूक माहिती आयकर विभागाला आता प्राप्त होऊ शकेल. विवरणपत्रकातील विसंगती टाळण्याकरिता किंवा रिटर्न फायनल करण्यापूर्वी AIS, TIS व फॉर्म 26 AS पडताळून मगच आयकर विवरणपत्र दाखल करणे योग्य ठरेल.
नितीन डोंगरे (करसल्लागार)